
(फोटो – पारगाव ता. दौंड येथील सातव्या माळेनिमित्त करण्यात आलेली विद्युत रोषणाई.) (छायाचित्र – त्रिभुज शेळके.पारगाव,दौंड)
त्रिभुज शेळके
बळीराजा वृत्तसेवा पारगाव (१६ )
दौंड तालुक्यातील पारगाव येथील ग्रामदैवत श्रीतुकाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी पूर्ण करून संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.पंचक्रोशीत नवसाला पावणारी देवी म्हणून तुकाईदेवी प्रसिद्ध आहे.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या वतीने विविध विकासकामे आणि भाविकांच्या सोयीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
उत्सवानिमित्त मुख्य मंदिर व प्रवेशद्वारावर आकर्षक आणि नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांना स्वच्छ व प्रसन्न वातावरणात दर्शन घेता यावे यासाठी संपूर्ण मंदिर परिसराची विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. तसेच परिसरामध्ये कायमस्वरूपी पथदिव्यांची सोय करण्यात आल्याने रात्रीच्या वेळीही मंदिर परिसर उजळून निघणार आहे. मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने समोरील संरक्षक भिंतीवर लोखंडी ग्रील बसवून रंगकाम पूर्ण करण्यात आले आहे.सालाबाद प्रमाणे ७ व्या माळेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या साठी मंदिर प्रशासन सज्ज आहे.
भाविकांच्या सोयीसाठी शौचालये व स्नानगृहांचे नूतनीकरण करण्यात आले असून अन्नदान व महाप्रसादासाठी नवीन स्वयंपाकगृह उभारण्यात आले आहे. मंदिर परिसरात फुलझाडे व लॉन तयार करण्यात आली आहे. भिंतीवर जाळी बसविण्यात आली आहे.नवरात्रौत्सवात सातव्या माळेला होणारी दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, भाविकांना सहज बाहेर पडता यावे यासाठी स्वतंत्र नवीन” एक्झिट गेट “तयार करण्यात आले आहे.सातव्या माळे निमित्त युवा कार्यकर्ते बापूसाहेब साळुंके यांचे आणि पारगाव मधील समस्त शेळके परिवाराच्या वतीने श्री.तुकाई देवी मंदिरा मध्ये भाविकभक्तांसाठी खिचडीचे सर्व भक्त गणांना वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दिवंगत अध्यक्ष अरुण बोत्रे यांचे योगदान स्मरणात
श्री. तुकाई देवी ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष अरुण बोत्रे यांनी मंदिराच्या विकासासाठी व धार्मिक परंपरा जपण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने मंदिराच्या सेवाकार्यातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या
कार्याची प्रेरणा घेत ग्रामस्थ व ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या विकासाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यात येत आहे.


