पाण्याचे पाझरण थांबल्याने विहिरी, कूपनलिकांवर परिणाम; सिंचनाअभावी पिके करपू लागली; अस्तरीकरणाच्या परिणामांचा फेरआढावा घेण्याची मागणी
शेतकरी आणि नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट; शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती

मनोज खंडाळे
आ.बळीराजा वृत्तसेवा(दि.२०)
कॅनॉलमधून होणारे पाण्याचे पाझरण जमिनीतील जलपातळी वाढण्यास हातभार लावत असल्याचे स्थानिकांचे आणि जानकारांचे मत आहे.मात्र, कॅनॉलचे अस्तरीकरण झाल्याने पाण्याचे पाझरण कमी झाले आणि त्याचा परिणाम परिसरातील विहिरी व कूपनलिकांवर झाला असल्याची चिंता शेतकरी आणि नागरिकांकडून आता व्यक्त केली जात आहे.पाऊस नाही आणि त्यात उन्हाळ्यासारखी पाणीटंचाई जाणवू लागल्याने शेतीच्या सिंचनाचा प्रश्न अधिकच गंभीर बनत असून, पिके पाण्याअभावी करपू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
कॅनॉल अस्तरीकरणाचा मुख्य उद्देश पाण्याची गळती रोखून सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे हा आहे. मात्र,या कामामुळे परिसरातील भूजलपातळीवर नेमका काय परिणाम झाला,याचादेखील तांत्रिक अभ्यास होणे आवश्यक आहे.कॅनॉलमधून पूर्वी होणाऱ्या पाझरणामुळे काही विहिरी आणि कूपनलिकांना मुबलक पाणी उपलब्ध होत होते का, तसेच अस्तरीकरणानंतर त्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे का, याची प्रत्यक्ष पाहणी आणि दखल घेऊन त्यावर काम करण्याची गरज दुष्काळ परिस्थितीमुळे निर्माण झाली आहे.
सध्या पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर पिके जगविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणी कमी झाल्यास सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था करणे शेतकऱ्यांसाठी मोठी खर्चिक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. आधीच शेतीचा वाढता खर्च, वीजपुरवठ्यातील अडचणी आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा अतिरिक्त फटका बसण्याची शक्यता मोठया प्रमाणात आहे.पाऊस नसल्याने काही पिके करपून गेली आहेत तर काही उरलीसुरलेल्या पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही,तर उत्पादनात घट होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते.
शेतकऱ्यांचे तक्रारी…
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कॅनॉलमधून पूर्वी होणाऱ्या पाण्याच्या पाझरणाचा परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांना फायदा होत होता. मात्र, अस्तरीकरणानंतर पाझरण कमी झाल्याने भूजलपातळी घट झाल्याची त्यांना भीती आहे. विहिरींमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने पिकांना वेळेवर सिंचन करणे कठीण होत असून, काही पिके पाण्याअभावी करपू लागल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्यास उत्पादनात घट होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावरही होत असून परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी… कॅनॉल अस्तरीकरणाच्या कामामुळे शेती आणि नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर प्रत्यक्ष परिणाम होत असल्यास संबंधित विभागाने त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. कॅनॉल परिसरातील विहिरी, कूपनलिका आणि भूजलपातळीची पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. गरजेनुसार भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांच्यातून पुढे येत आहे.पाणी वाचविण्याच्या उद्देशाने होणाऱ्या कामामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. विकासकामांचा जलस्रोतांवर होणारा परिणाम तपासून शेती आणि जनजीवनाच्या हिताला प्राधान्य देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया शेतकरी आणि नागरिकांच्यातून उमटू लागली आहे .


