
(त्रिभुज शेळके)
आ.बळीराजा वृत्तसेवा पारगाव (दि.२१)
राजकारणात प्रत्येक निवडणुकीच्या काळात गावपातळीवरील पुढाऱ्यांची धावपळ वाढते. कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, कोणाच्या बाजूने मतदान करायचे आणि कोणाला विजयी करायचे, यासाठी मतदारांना सल्ले देण्याची स्पर्धाच सुरू होते. उद्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक आहे. मात्र या निवडणुकीत आठवी, दहावी पास असलेले काही गावपुढारी पदवीधर मतदारांना इकडे मतदान करा, तिकडे मतदान करा, असे सांगत असल्याने सुशिक्षित मतदारांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
स्वतःचे शिक्षण मर्यादित, पण पदवीधरांना मतदानाचे मार्गदर्शन! अशी परिस्थिती पाहून काही पदवीधर मतदारांच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे. उच्चशिक्षित मतदारांना राजकीय भूमिका, उमेदवारांची पात्रता आणि निवडणुकीतील मुद्दे समजत नाहीत, अशा आविर्भावात काही गावपुढारी मार्गदर्शन करत असल्याचे चित्र दिसत आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असून, कोणाला मतदान करायचे हा प्रत्येक मतदाराचा वैयक्तिक निर्णय आहे. मतदारांना आपली भूमिका पटवून देणे वेगळे आणि त्यांच्यावर मतदानासाठी दबाव टाकणे वेगळे, यातील फरक राजकीय कार्यकर्त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.
शिक्षण कमी असणे हा कोणाच्याही क्षमतेचा कमीपणा नाही; मात्र मतदारांच्या बुद्धिमत्तेला कमी लेखून त्यांना मतदानाचे धडे देण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून विनोदच निर्माण होतो. त्यामुळे पदवीधर मतदारांना सल्ले देण्यापेक्षा त्यांच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवणे, हाच राजकीय पुढाऱ्यांसाठी योग्य मार्ग ठरणार आहे.मतदारांना मतदानाचे धडे देण्यापेक्षा त्यांच्या निर्णयाचा आदर करा, असाच संदेश या चर्चेतून पुढे येत आहे.


