
बळीराजा वृत्तसेवा यवत (दि.१६)
दौंड तालुक्यातील डाळिंब येथे तरुणाच्या अपहरणानंतर विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या खळबळजनक प्रकरणाचा अखेर छडा लावण्यात यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. भिमाशंकर धोंडीबा खंडागळे (वय ३५, रा. डाळिंब, ता. दौंड) यांचा किरकोळ शिवीगाळीचा राग मनात धरून गळा दाबून खून केल्याची कबुली दिल्याच्या आधारे विजय सुभाष लेचरूड (वय ४०, रा. डाळिंब) याला पोलिसांनी गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी अटक केली. यवत पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती शी की दि.३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास डाळिंब येथील नंदा धोंडीबा खंडागळे यांचा मुलगा भिमाशंकर हा राहत्या घरातून बेपत्ता झाला. त्याचे अपहरण झाल्याची तक्रार यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यानुसार यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना दि. ८ ऑक्टोबर रोजी डाळिंब येथील रमेश म्हस्के यांच्या विहिरीत भिमाशंकर याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे हात-पाय लोखंडी तारेने बांधलेले होते. तसेच मृतदेहाला मोठा दगड बांधून तो विहिरीत टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी त्या पद्धतीने तपासाची दिशा निश्चित केली.
तपासादरम्यान विजय सुभाष लेचरूड याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला दि. १५ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान भिमाशंकर याने किरकोळ शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मृतदेहाचे हात-पाय लोखंडी तारेने बांधून आणि मृतदेहाला मोठा दगड बांधून तो विहिरीत फेकल्याचेही तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी विजय लेचरूड याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल,अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करीत आहेत


