HomeUncategorizedनिसर्गाचा लहरीपणा, विजेचा लपंडाव अन् चोरांचा सुळसुळाट; नदीकाठचे शेतकरी संकटात ​विद्युत पंप...

निसर्गाचा लहरीपणा, विजेचा लपंडाव अन् चोरांचा सुळसुळाट; नदीकाठचे शेतकरी संकटात ​विद्युत पंप फोडून तारांची चोरी;#crimepunerural,#ruralpolice

फोटो – पारगाव ता. दौंड येथील विद्युत पम्प फोडून तांब्याच्या तारांची चोरी (छायाचित्र – त्रिभुज शेळके )

त्रिभुज शेळके
आ.बळीराजा वृत्तसेवा पारगाव (दि.२०)

या वर्षी पावसाने दगा दिल्याने शेतकरी आधीच मोठ्या संकटात सापडला आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याची पातळी खालावल्याने पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. अशा गंभीर परिस्थितीत शेती वाचवण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीला महावितरणच्या विजेच्या लपंडावाने खीळ घातली असतानाच, आता नदीकाठच्या शेतांमध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी नदीवरील विद्युत पंपांची तोडफोड करून आतील तांब्याची तार चोरून नेल्याची धक्कादायक घटना पारगाव येथे घडली आहे.पारगाव येथील शेतकरी शरद बोत्रे यांची ७:५, बाळासो जगताप यांची १५, सचिन वाघोले ५ तर बाळासो गायकवाड यांच्या १२:५ अश्वशक्तीचे विद्युत पम्प चोरट्यांनी फोडून आतील तांब्याच्या तारा नेऊन लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.
​
विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पिके जगवण्यासाठी नदीपात्रातून पाइपलाइन करून विद्युत पंप बसवले आहेत. दिवसा आणि रात्री विजेचा सतत खेळखंडोबा सुरू असल्याने पिकांना पाणी देणे आधीच मुश्किलीचे ठरत होते. त्यातच आता चोरट्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांवर ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी वेळ आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नदीकाठावरील शेतांमध्ये चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या सुमारास नदीपात्रातील शेतीपंपांचे नुकसान करून, पंप फोडून त्यातील महागडी तांब्याची तार लंपास केली जात आहे.हे विद्युत पम्प फोडल्या मुळे शेतकऱ्याला नवीन पम्प खरेदी करावे लागत आहे. तर कधी केबल चोरीला जात आहेत.
सकाळी शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना पंप फुटलेल्या अवस्थेत आढळल्याने ही बाब उघडकीस आली.एकाच रात्रीत अनेक शेतकऱ्यांचे पंप फोडण्यात आल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
विद्युत पंप दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च येणार असून, ऐन पाणी देण्याच्या मोसमात पंप बंद पडल्याने उभी पिके करपण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. महावितरणने शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा आणि पोलिसांनी या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी संतप्त मागणी त्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments