महाराष्ट्र
कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीप्रकरणी सराईत आरोपी जेरबंद; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
दौंड वार्ताहर ता.२८ नाथाचीवाडी परिसरातील माटोबा तलाव येथून कृषीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरीच्या प्रकरणाचा यवत पोलिसांनी छडा लावत सराईत आरोपीला जेरबंद केले. आरोपीकडून चोरीस गेलेल्या १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या केबलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल तीनही गुन्ह्यांतील चोरीचा १०० टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दौंड वार्ताहर ता.२८
नाथाचीवाडी परिसरातील माटोबा तलाव येथून कृषीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरीच्या प्रकरणाचा यवत पोलिसांनी छडा लावत सराईत आरोपीला जेरबंद केले. आरोपीकडून चोरीस गेलेल्या १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या केबलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल तीनही गुन्ह्यांतील चोरीचा १०० टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान नाथाचीवाडी (ता. दौंड) येथील माटोबा तलाव परिसरातून तब्बल २० शेतकऱ्यांच्या मोटारपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यवत पोलिसांनी तातडीने तपास पथक तयार केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून अज्ञात आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मनोज गुलाब बिंद (वय ३७, व्यवसाय मजुरी, सध्या मांजरी फार्म, ता. हवेली; मूळ रा. बरेनी बारीपूर, ता. कच्छुआ, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने सदर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडून १ लाख १५ हजार रुपये किमतीच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल आणि गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस हवालदार संदिप देवकर, रॉकी देवकाते, महेंद्र चांदणे, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, मारुती बाराते, प्रतिक जगताप, अमोल भुजबळ, सचिन गुंड, दिनेश लोणकर आणि विनित कुऱ्हाडे यांनी सहभाग घेतला.