Home महाराष्ट्र पारगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न; गरजू महिलांची सोनोग्राफी मोफत...

पारगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न; गरजू महिलांची सोनोग्राफी मोफत होणार : डॉ. गायत्रीताई खळदकर

0

त्रिभुज शेळके

बळीराजा वृत्तसेवा पारगाव (ता.१७)

शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून “सेवा संकल्प अभियान — माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या संकल्पनेतून पारगाव येथे शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात तपासणी झालेल्या ज्या महिलांना पुढील उपचारासाठी सोनोग्राफीची आवश्यकता भासणार आहे, त्यांची सोनोग्राफी निरामय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, केडगाव येथे पूर्णपणे मोफत केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा जिल्हा परिषद सदस्य डॉ. गायत्रीताई खळदकर यांनी यावेळी केली.


​तुकाई देवस्थान ट्रस्ट, आयुष्मान आरोग्य मंदिर, नानगाव उपकेंद्र पारगाव, निरामय हॉस्पिटल केडगाव, जनसेवा हॉस्पिटल पारगाव आणि ग्रामपंचायत पारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी आणि आरोग्याविषयी जनजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
​शिबिरामध्ये नागरिकांची रक्तदाब, ईसीजी, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, वजन-उंची व बीएमआय तपासणी करण्यात आली. याशिवाय किरकोळ आजारांवर औषधोपचार व तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले. तसेच शासनाच्या आभा कार्ड आणि आयुष्मान भारत गोल्डन कार्ड नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.


​या प्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ. मनिषाताई ताकवणे, ग्रामविकास अधिकारी श्री. मुरलीधर बढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत उघडे पाटील, डॉ. सौरभ कोरेकर, डॉ. प्रद्या फावडे, जनसेवा हॉस्पिटलचे डॉ. उत्कर्ष रूपनवर, आरोग्य निरीक्षक श्री. राजेंद्र भोस, आरोग्य सेविका श्रीमती रिबिका साठे, आरोग्य सेवक श्री. मनोज वासेकर, सिस्टर सारिका सकट, श्री. पांडुरंग पाटोळे यांच्यासह सर्व आशा सेविका, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version